व्यापारी मित्र

सोशल नेट्वर्किंग : व्यवसायवाढीची गुरुकिल्ली

‘सोशल नेट्वर्किंग’ असं म्हंटल, की आपल्यासमोर येतात त्या-फेसबुक, व्हॅाटस्अप, लिंक्ड-इन अशा वेबसाईटस् खरंही आहे ते परंतु सोशल नेट्वर्किंग म्हणजे काही फक्त ह्या वेबसाईटस् असचं काही नव्हे. खूप विस्तृत अर्थ आहे ह्या शब्दाचा, आणि प्रत्येक व्यावसायिक खूप सुंदर पद्धतीने या तंत्राचा वापर करून व्यवसाय वाढवू शकतो. खरं म्हणजे आपल्या आजूबाजूला आपण असे अनेक यशस्वी व्यावसायिक पाहत असतो. जाणते-अजाणतेपणी यांचं नेट्वर्किंग कौशल्य वाखाणण्याजोगं असतं.

‘सोशल नेट्वर्किंग’ म्हणजे काय?

दोन शब्दांची ही फोड आहे. सोशल म्हणजे सामाजिक किंवा समाजासंबंधी किंवा तत्सम आणि नेट्वर्किंग म्हणजे चक्क जाळं विणणे किंवा जाळं तयार करणे. आपल्यासाठी ह्या शब्दाचा अर्थ समाजातील संपर्कातून आपलं एक स्वत:चं संपर्क जाळं निर्माण करणं. हे कशासाठी? नक्कीच व्यवसायासाठी, पण भेटणाऱ्या प्रत्येक व्यक्तीबरोबर तुमचा ‘व्यवसाय’ हा एकच हेतू असतो असं नाही. तरी एक हाडाचा उद्योजक किवा व्यावसायिक भेटणाऱ्या प्रत्येक व्यक्ती कडून संधी ‘खणत’ असतोच.  यातूनच संधी शोधत राहणे परंतु नात्याचा तोल सांभाळणे ह्याकरिता काही क्लृप्त्या.

1. तुमचं व्हिजिटिंग कार्ड :

तुमच्या व्यवसायाची सर्वात छोटी, परंतु सर्वाधिक प्रभावी जाहिरात कुठली असेल तर ती म्हणजे तुमचं व्हिजिटिंग कार्ड. शिवाय समोरच्या व्यक्तीला तुम्हाला संपर्क करायचा असला तर ती तुम्हाला कुठे/ कसा करेल ? तर ते व्हिजिटिंग कार्डवर असतंच, त्यावर तुमचं नाव- पत्ता, मोबाईल नंबर, ई-मेल व वेबसाईट असल्यास तो वेब अॅड्रेस, नसेल तर फेसबुक/ लिंक्ड इन कनेक्ट तरी छापून घ्याच! हे कार्ड (निदान ५-५० तरी) सदैव जवळ ठेवा.

2. प्रत्येकाला तुमचं कार्ड देऊ नका :

प्रत्येक ठिकाणी, प्रत्येक व्यक्तीला तुम्ही तुमचं कार्ड द्यायलाच हवं असं नाही. कारण आपल्याला अनेक प्रसंगी अनेक माणसं भेटतात, त्यातली सर्वच माणसं आपल्या व्यावसायिक उपयोगाची असतातच असं नाही. तसंच त्यांनाही आपलं उत्पादन सेवा उपयुक्त ‘असेलच’ असं नाही. त्यामुळे आवश्यक तिथेच कार्ड द्या आणि घ्या. अर्थात कोणी दिलंच तर…. नम्रपणे स्वीकारा, मागितलंच तर ‘नाही’ म्हणू नका.

3. संपर्कात आलेल्या व्यक्तींचा तपशील :

हे खूप महत्वाचे आहे. जी व्यक्ती तुम्हाला महत्वाची वाटते, ती व्यक्ती तिच्यासोबत तिचे कार्ड घेऊन फिरेलच असं नाही, परंतु तुमच्याकडे तुम्ही तुम्हाला आवश्यक त्या नोंदी जरूर करून घेऊ शकता. माझे एक मित्र-विवेक गोडसे- जे एक आघाडीचे विमा-सल्लागार आहेत. त्यांनी चक्क एक रिकामं व्हिजिटिंग कार्डच बनवून घेतलेलं आहे. त्यात ते भेटणाऱ्या व्यक्तीचा तपशील टाकून घेतात. (टीप: एखद्या कौटुंबिक सोहळ्यात हे सर्वांदेखील करता येणार नाही. करून नका. पण तपशील पुढच्या भेटीत मात्र घ्याच.)

4. संपर्काची वर्गवारी :

कौटुंबिक सोहळे किंवा इतर प्रसंग सोडून व्यावसायिकाच्या जीवनात असे काही प्रसंग येतात, की जिथे एकदम गठ्ठ्याने कार्ड्स जमा होतात. उदा, एखादं प्रदर्शन, प्रशिक्षण किंवा एखादा नेट्वर्किंग कार्यक्रम. या कार्यक्रमांचं उद्दिष्टच नेट्वर्किंग हे असल्याने, कार्ड देणे घेणे अगदी स्वाभाविक असतं. आणि समोरचाही आपल्याला कार्ड देतो मागतो. परिणामी, असा एखादा कार्यक्रम संपल्यावर आपल्याकडे जमते कार्डाची थप्पी, त्याचं काय करायचं हा प्रश्न तुम्हाला तरी अनेक वेळा पडला असेल, तर मी त्यांची चक्क वर्गवारी करतो.

‘अ’ वर्गातले संपर्क :

अत्यंत महत्वाचे संपर्क ज्याला जाळ्यात सापडलेला ‘मोठा मासा’ असं म्हणता येईल, किंवा त्यापर्यंत नेणारा संपर्क. ही कार्डस् ‘अ’ म्हणून वेगळी काढा.

‘ब’ वर्गातले संपर्क :

तुलनेने कमी महत्वाचे परंतु अत्यंत उपयुक्त यांना देखील भेटायचं आहेच. पण उपक्रम ‘अ’ नंतर.

‘क’ वर्गातले संपर्क :

जाळ्यातल्या माशांच्या व्यतिरिक्त सापडलेल्या इतर गोष्टी असं म्हणता येईल. तूर्तास बाजूलाच ठेऊन द्या.

5. पाठपुरावा अर्थात फॅालो-अप :

पाठपुरावा म्हणजे काय? तर समोरच्या व्यक्तीला आपण जी गोष्ट ‘मी करीन’ असे सांगितले आहे नेमक्या वेळी ती करणे. उदा., भेटीत असं ठरतं असेल कि समोरची व्यक्ती २ दिवसांत तुम्हाला फोन करणार आहे. तर २ दिवसांत तिचा फोन न आल्यास तुम्ही करणे.

हा पाठपुरावा अत्यंत महत्वाचा ठरतो. एका अहवालानुसार असं लक्षात आलं, की पाठपुरावा करणाऱ्या व्यक्तींना अशा कार्यक्रमांतून अधिक यश प्राप्त होतं.

6. पाणीपुरावा करण्याची साधने:

डायरी :

सर्वात लहान, परंतु अत्यंत उपयुक्त, सोपं साधन म्हणजे तुमची डायरी, तुमच्या डायरीत तारीखवार- त्या त्या व्यक्तींच्या पाठपुराव्याच्या नोंदी करा. किंवा एका सध्या कागदावर आठवड्याच्या ६ वारांचे (एक दिवस सुट्टी) ६ कप्पे तयार करा आणि त्यात सदर नोंदी टाका, म्हणजे एका कटाक्षात आठवड्याचा फॅालोआप कार्यक्रम लक्षात येईल.

हायलायटर पेन :

छोटसं पण अत्यंत उपयुक्त हे पेन तुमच्या मजकुरावरून फिरवल्यास मजकूराभोवती एका फिक्कट रंगाचा पडदा तयार होतो, मुल मजकूर तसाच राहून विविध रंगातले हायलायटर तुम्ही वापरू शकता. उदा., प्रथम भेटीला गुलाबी वगैरे कल्पकतेने वापर करा.

मोबाईल फोन :

स्मार्ट फोनच असायला हवा असं अजिबात नाही, अगदी साध्यातला साधा फोनमध्ये सुद्धा कॅान्टॅक्ट, अलार्म आणि कॅलेंडर ह्या सोयी असतात. या तीनही सुविधांचा उपयोग तुमच्या पाठपुराव्यासाठी उत्तम होऊ शकतो.

7. प्रत्यक्ष संपर्क / भेट :

पाठपुराव्याचे प्रयोजन काय ? तर त्यातून पुढची प्रत्यक्ष समोरासमोर भेट घडणे आणि त्यातून व्यवसाय मिळणे. तर अशी भेट घडून तुम्हाला व्यवसाय संधी उत्पन्न झालीच, तर तुम्ही बाजी मारलीत, परंतु यंदा कदाचित तसं झालं नाही, किंवा लांबणीवर पडलं, तर ९० % लोक त्या व्यक्तीला पुन्हा संपर्क जाळ्यात ठेवत नाहीत असं आढळून आलंय. इथेच पाणी मुरतंय, कारण हीच ती मंडळी असतात / आहेत जी आपल्याला आज नाही, तरी भविष्यात नक्कीच व्यवसाय देऊ शकतात. आपण प्रत्यक्ष नाही, परंतु अप्रत्यक्षरीत्या तर नक्कीच त्यांच्याशी संपर्क ठेऊन त्यांच्या दृष्टीसमोर राहू शकतो. हे आवर्जून करायला हवं.

images for vyaparimitra lekh6.38. सोशल नेट्वर्किंग साईट्स :

व्हॅाटस्अप, फेसबुक, लिंक्ड इन द्वारे हे सहजरीत्या करता येतं. फक्त ह्यात काही पथ्य पाळा. उगाचंच संपर्कात राहण्याच्या नादात निरुपयोगी संदेश पाठवू नका. पुष्पगुच्छ, गुड मोर्निंग संदेश पाठविण्याऐवजी मधूनच एखादा प्रत्यक्ष फोन करा. किवां तुमच्या क्षेत्रात घडणाऱ्या इतर गोष्टी अथवा बातम्या हव्या आहेत असं सुद्धा या मध्यमांवरून वितरीत करा. यामुळे तुमच्या ह्या क्षेत्रातला अधिकार सिद्ध व्हायला मदत होईल.

9. आकडेमोडीचा खेळ :

हा सगळा आकडेमोडीचा खेळ आहे. जेव्हा तुम्ही हे ठरवता की मी अगदी नेमक्या अशा आणि फक्त माझ्या व्यावसायाला उपयुक्त अशाच व्यक्तींशी संपर्क ठेवणार आहे. तेव्हा तुमच्या लक्षात येईल की डोंगर पोखरून उंदीर निघतोय.

पण हा उंदीर नसणार आहे. या उंदराचा कदाचित सिंह्ही होऊ शकणार आहे. पण त्याकरिता डोंगर पोखरत राहणं हेच आपलं काम आहे. आणि अधिकाधिक डोंगर पोखरंत राहणं म्हणजे अधिकाधिक संपर्क संधी ! अधिकाधिक व्यक्तींना भेटत राहणे.

10. काही नेट्वर्किंग / संपर्काच्या संधी :

  • उद्योजकांच्या संघटना.
  • स्वयंउद्योजकांची नेटवर्कस् : उदा. स्टँडर्ड क्लब.
  • बिझनेस नेटवर्कस : उदा. बीएनआय.
  • सामाजिक क्लब : उदा. रोटरी इंटरनॅशनल
  • फेसबुक वरील ग्रुप्स : असंख्य आहेत
  • एखाद्या विषयावरचे प्रशिक्षण.

ह्या शिवाय असंख्य ठिकाणी संधी ‘आ’ वासून उभ्या असतात. फक्त आपण तिथपर्यंत पोहचायला हवं म्हणजेच डोंगरापर्यंत पोचायला हवं. पाठपुरावा उत्तम करून व्यवसाय संधी निर्माण करायला हवी आणि मिळालेल्या संधीचं ‘सोनं’ करायला हवं.

या संधी जाणण्यासाठी फक्त तुमचे डोळे – कान जागृत ठेवा. बस्स ! एखादी आदर्श संधी कदाचित तुमचं दार ठोठावत असेल !

Have any Question or Comment?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Subscribe to our Newsletter

Subscribe to our Newsletter

Reviews