वेब-साईट वरील तुमच्या विषयीच्या पानाचे महत्त्व

वेब साईट वरील अनेक “पेजेस”

जशी पुस्तकाची पाने असतात, तशीच वेब साईट ची पानेच असतात, ज्यांना वेब पेजेस म्हटलं जातं. साधारणत: एखादा व्यापारी, छोटा-मोठा उद्योजक, त्याची वेब-साईट बनवतो; तेव्हा त्यातल्या “About Us”  अर्थात तुमच्या विषयीच्या पानाला व इतर पेजेस ना किती महत्त्व देतो? एकंदरीतच सर्व वेब-साईट वरील मजकुराला किती महत्त्व देतो, ह्यावरून त्याच्या किंवा तिच्या व्यवसायाच्या online यशाचे मोजमाप ठरते.

मुळातच ह्या प्रकारच्या म्हणजे online व्यवसायाचे स्वप्न तुम्हाला पडत असेल, तरी हुरळून जाऊ नका. तुम्ही लाखो रुपये खर्च करून एखादी App बनविलीत किंवा एखादी इ-commerce साईट तयार केलीत, तरी ती लोकांपर्यंत पोहोचून त्यातून प्रत्यक्ष अर्थार्जन आणि तेही फायदेशीर अर्थार्जन व्हायला लागणे हे तुमचं प्रमुख उद्दिष्ट असायला हवं. म्हणजेच प्रथम हवं नियोजन: साईट लोकांपर्यंत कशी पोहोचेल, ह्याचं.

सर्वप्रथम सर्वाधिक आस्थेने तुमची वेब साईट कोण बघतील?

तुमचे आप्त स्वकीय, तुमच्या उत्पादन किंवा सेवेचे तांत्रिक डीटेल्स व स्पेक्स जाणून घ्यायची इच्छा असणारे लोक इ. सर्वात आधी, जास्तीत जास्त व्यवस्थित पणे तुमची साईट बघतात. खरं म्हणजे अशीच व्यूहरचना हवी. त्यांना एका झटक्यात कळावं की तुमची उत्पादनं/सेवा काय,  कुठल्या प्रकारच्या आहेत, तुम्हाला संपर्क कसा करायचा वगैरे. ह्या मध्ये सर्वात महत्त्वाचं ठरतं ते म्हणजे तुमचं “अबाउट अस” अर्थात तुमच्या विषयी माहिती असणारं पान.

कसं असावं “अबाउट अस” (About Us) हे पेज?

रचना अगदी सहज सोप्पी असावी.खाली दिलेल्या ले-आउट वरून तुमच्या सहजच लक्षात येईल. तुमचा एक छानसा फोटो डावीकडे किंवा उजवीकडे असावा. सोबत माहिती. अगदी सखोल नको पण साधारण व्यवसायाला साजेशी आणि विषयाला धरून ही माहिती असावी. वेबसाईट हा तुमच्या व्यवसायाचा आरसा असतो. त्यात लोकं येतात, डोकावतात. ह्याचा सकारात्मक-नकारात्मक दोन्ही पद्धतीने परिणाम होऊ शकतो. आपल्याला सकारात्मकच हवाय.

त्याकरिता नोंद घेण्याजोग्या काही बाबी:-

  • थोडक्यात, परंतु संपूर्णपणे तुमचा उद्योजकीय प्रवास लिहायला हरकत नाही.
  • तुमच्या टीम विषयी, शाखांविषयी जरूर लिहा.
  • तुमचे सदर विषयात जर काही विशेष शिक्षण झालं असेल तर लिहा.
  • शिक्षण नसेल, तरीही लिहा. अनुभवा इतका मोठा शिक्षक जगात दुसरा नाही.
  • काही पारितोषिके मिळाली असल्यास.. “यशस्वी व्यापारी” वगैरे  वैयक्तिक. कंपनीचे आय.एस.ओ. वगैरे नको. (इथे तुमच्या विषयी लिहायचंय)
  • सामाजिक भान म्हणून तुम्ही एखादा उपक्रम राबवीत असाल, तर जरूर नमूद करा.
  • आणखीही काही महत्त्वाचं वाटल्यास लिहा.

टीप:

  • संक्षिप्त रहा, बखर नको.
  • फोटो कसा असायला हवा? तुमच्या व्यवसायाला धरून. व्यापारी-कारखानदार असाल, तर चांगल्या शर्ट-पँटमध्ये, शक्य झाल्यास ब्लेझरमधेही हरकत नाही. व्यावसायिक व्यक्तीकडून फोटो काढून घ्या. ते एडीट सुद्धा करून देतात. करून घ्याच.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *