शिक्षणवेध

आधुनिक तंत्रे : वापरातला विवेक आवश्यक

नुकतीच एक बातमी वाचण्यात आली… “डिजिटल शाळांसाठी ९० कोटी रुपये” ह्यात इंटरॅक्टीव की बोर्ड इत्यादी अत्याधुनिक साधने मुलांच्या हातात देणार आहेत म्हणे. प्रयत्न, संकल्पनेचा उद्देश अर्थात चांगलाच आहे, असतोच तो बहुतेक वेळा. फक्त ह्यांनी ही मुलं सबळ होतात, की लुळी पांगळी होतात, हा खरा प्रश्न आहे.

त्सुनामीच्या संदर्भात एक घटना आठवतेय. जपान मधल्या अत्याधुनिक सिग्नल यंत्रणेमुळे समुद्रापासून जवळच असलेल्या एका शाळेत सुमारे १५ मिनिटे आधीच त्सुनामीची पूर्व कल्पना मिळाली होती मुलांना, शिक्षकांना. तरीही मुलं लाटांत बुडून गेली. कारण ठाऊक आहे? तर त्यांना “प्रोटोकॉल” म्हणजे अशी घटना घडल्यानंतर कोणती ठराविक कृती करायची याची म्हणे कल्पनाच दिली गेलेली नव्हती. छान!

ही तर सगळी मुलभूत, जीवनावश्यक कौशल्ये !

म्हणजे अगदी स्वाभाविक अशी संवेदना- म्हणजे घाबरून पळून जाणे आणि अधिक उंच ठिकाणी जाऊन उभे राहणे हे सुचायलाही “प्रशिक्षण” लागतं? दूर कशाला-आपल्या नुकत्याच झालेल्या मुरूडच्या दुर्घटनेनंतर एका वाचकाने सकाळला लिहिलेलं एक पत्रही साधारण ह्याच सुरातलं होतं. त्याचं म्हणणं होतं, की स्वयं बचाव हे मुलभूत कौशल्य (?) मुलांना कसं अवगत नाही? मुळातच आपण अनावश्यक शिक्षण जास्त घेत राहतो म्हणजे जीवनास आवश्यक नसणाऱ्या अनेक गोष्टी आपण शिकत जातो-राहतो; आणि आवश्यक गोष्टी आपल्याला अवगतच नसतात. उदा. खासकरून पुरुष मंडळींनी घरातला केर काढणे, कांदा चिरणे, अगदी पोळ्या नाहीत तरी भाताचा कुकर लावणे ह्या गोष्टी तरी करायला हव्यात. नारळ सोलणे, खवणे ही कौशल्ये तर बायकाही विसरून गेल्याहेत, पुरुषांची बातच नाही.

डिजिटल “बाळां” चे कौतुक

हेच पुरुष-स्त्रिया-मुले त्यांची डिजिटल “बाळे” अगदी लीलया सांभाळतात. त्यांना (मुलांना) त्यांच्या वयात अनावश्यक असलेला तपशील, चोख तोंडपाठ असतो. उदा. होंडा चं कोणतं मॉडेल बाजारात आहे, लीनोव्हो चा tab सध्या कितीला मिळतोय. इ. आपल्या चाकरमान्या स्त्रियाही त्यांची whatsapp स्टेटसं अगदी शिताफीने आणि जलदगतीने अपडेट करताना दिसतात. पण ह्याच मातांना पोळी कुस्करायला नको असते, मिक्सरच लागतो हाताशी. मुळात मुद्दा असा आहे, की ह्या नव-नव्याच्या नादात, आपण आपली सहज-स्वाभाविक संवेदनशीलता हरवून जाणार नाही, ह्याचं भान ठेवायलाच हवं. तुम्ही-आम्ही-पालकांनी. म्हणजे त्या मुलांना ह्या गोष्टींच्या पूर्ण आहारी जायचं नसतं हे कळेल तरी.

पोरगं अभ्यासच करत न्हाय राव !

काही वर्षांपूर्वी मी संगमनेरला गेलो होतो. मी आणि माझा एक मित्र तेव्हा टोमॅटोचे क्रेट्स विकायचो. सकाळीच मार्केट यार्डात आम्ही एका दुकानाच्या बाहेर पोचलो. दुकानात मालक यायचे होते. एक साधारण ९-१० वर्षांचं पोरगं दुकानावर होतं. आम्ही म्हटलं मालक आल्यावर येऊ, तेवढ्यात त्या मुलाने हातातल्या क्रेटकडे नजरेने बघत–कमालीच्या व्यावासिकतेने विचारलं…

“कॅरट दिसतंय – काय वजन? १६५ भरलं का?”

आम्ही अर्थात चकित. म्हटलं: हिंदी सिनेमातल्या पोरांसारखाच हा एक आगाऊ कार्टा दिसतोय. काट्यावर टाकलं– वजन १६२ ग्राम भरलं. पुढे त्या चिमुरड्याने आम्हाला अनंत प्रश्न विचारले. “डीलेवरी येळेत देनार का? आठवड्यात किती गाड्या येत्यात? पेमेंट क्याश दिलं तर चालेल का? उधारी किती दिवसांची?” आता मात्र आम्ही स्तिमित झालो. हे असलं तुमच्या आमच्या मुलांना अजिबात ठाऊक नसतं. आपण विशेष लक्षही देत नाही ह्या गोष्टीकडे.

तेवढ्यात दस्तूर खुद्द मालक (त्याचे वडील) हजर. त्यांनी त्या मुलाला “च्या” ची आडर द्यायला पाठवलं, आणि आम्हाला काकुळतीने सांगायला लागले… “पोरगं अभ्यासच करत न्हाय राव”

त्या घटनेनंतर मला वाटू लागलं की हेच खरं शिक्षण, बाकीचं काही खरं नाही वगैरे. पण त्या दुकानदार – बापाची एक चिंता पण रास्त होती, की त्याने (मुलाने) जर पद्धतशीर शिक्षण घेतलंनाही, त्याला त्या शिक्षणातच जर रस उरला नाही, तर? ह्याकरिता प्रत्यक्ष काम – ते करता करता होत जाणारं शिक्षण सर्वात महत्त्वाचं. सोबत आपलं काम अधिक प्रभावीपणे कसं करता येईल ह्याची माहिती घेण्यासाठी ठरवून घेतलेलं शिक्षण हे देखील महत्त्वाचं. प्रत्यक्ष “गरज” होण्या अगोदरच त्यासाठी वेगळा वेळ आपल्या वेळापत्रकात ठेवणे ह्याची सवय ह्या शालेय शिक्षणातून लागते. तंत्र कधी, कसं, कुठे ह्याचा विवेक साधता आला, म्हणजे खरं आधुनिक शिक्षण झालं असं समजता येईल.

आपले शेतकरी बंधू ह्या मोबाईल क्रांतीचा खूपच छान फायदा करून घेतात. त्यांचे खूप ग्रुप्स आहेत. शेतीतील नव-नवी तंत्रे, शिबिरे, योजना शेअर करतात, स्व-मदत गट स्थापतात. काही काही तर आत्महत्या – समुपदेशन गटही कार्यान्वित आहेत. ह्याना कुठून मिळालं शिक्षण? तिथे तर स्रोतही खूपच अल्प. तरीही गरज हीच शोधाची जननी ह्या तत्वानुसार ह्या साऱ्यांनी हे साधलंय.

अशी उदाहरणे मुलांसमोर ठेवा

माझ्या माहितीत, कौटुंबिक समस्यांमुळे परत माहेरी आलेली एक नगरची महिला उद्योजिका आहे. भाऊ–भावजयी तिला अत्यंत प्रेम-आदराने वागवतात, वागवायचे. पण तिचा आत्मसन्मान तिला स्वस्थ बसू देईना. तिच्या कडचं “शिक्षण” तिला नोकरी मिळवून देत नव्हतं, पण पायावर तर उभं राहायचंच होतं. तिच्या कडच्या पाक-शास्त्र निपुणतेचा तिने अत्यंत खुबीने वापर केला. घरात आल्या दिवसापासून स्वयंपाकाची पूर्ण जबाबदारी तिने उचललेलीच होती, त्यात तिने फक्त एकच “जास्तीची” गोष्ट केली. भावाच्या मित्र मंडळीना–ओळखीच्यांना सांगायला सुरुवात केली, की “उद्या सकाळी आम्ही नाश्त्यात काय करणार आहोत-उप्पीठ, पोहे, मिसळ इ. तुम्हालाही हवं असेल, तर कळवा आणि डबा घेऊन या, आणि अमुक दराने सकाळी अमुक वाजता घेऊन जा.” हा होता पहिला प्रयोग. ह्यात यश आलं. पुढे तिने Sms द्वारे कळवायला सुरुवात केली. आता कदाचित Whatsapp असेल. तसेच पॅकिंग साठी तिने हळू हळू अॅल्युमिनिनिअम च्या फॉइल वापरायला सुरुवात केली. सकाळ बरोबरच दुपारची भाजी-पोळी सुद्धा द्यायला सुरुवात केली, इ.

गरजेनुसार, पण जाणीवपूर्वक तंत्राचा वापर केला, तर तंत्र हे सहाय्यक होतं, नाहीतर आपल्या खात्यात एक अनावश्यक शिक्षण म्हणून पडून राहतं. आपण पालक म्हणून मुलाला “डिजिटल की बोर्ड वापरू नको” असं म्हणू शकणार नाही कदाचित. शाळेत, त्या शिक्षणाच्या पद्धतीत होत जाणारा, आपल्या हातात नसणारा बदल आहे तो. पण, ते एक फक्त नवं माध्यम आहे, तेच म्हणजे शिक्षण नव्हे, हे त्याला समजावून सांगणे, हे तरी आपण नक्कीच करू शकतो. हाच तर विवेक साधायला हवा.

Have any Question or Comment?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Subscribe to our Newsletter

Subscribe to our Newsletter

Reviews